""मला हवी आहेस""
""मला हवी आहेस""
प्रिय आईस,
सर्वकाही सांगावं, खूप काही विचारावं असं लहान असल्या पासून वागणारा मी आज स्वतःच्या संसारात किंवा स्वतःच्या कामात इतका अडकलो आहे कि तुझ्याशी बोलायची इच्छा असून सुद्धा ते प्रत्यक्षात घडत नाही.
माझ्या लहानपणी मला ताप आला किंवा माझ्या पोटात दुखायला लागले किंवा आता जरी मला काही व्हायला लागलं कि तुझ्या मनाची होणारी घालमेल, माझ्या संगोपनात कुठलीही कमतरता न व्हावी म्हणून तू करणारी धडपड, दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्याचा पाठ पुरावा. अखंड चालू असलेली तुझी धावपळ.... हे मी माझ्या बाळपणापासून आजपर्यंत रोज पाहतो आहे अनुभवतो आहे. तेच मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात आठवणींच्या रूपात साठवले आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ठेवा मी त्यात सहज रमून जातो.
हेच सगळे मी तुझ्या आईत सुद्धा पाहिले, आजोळ म्हणजे हक्काची जागा आई साठी आणि नातवंडासाठी सुद्धा. आज्जीवर लिहायचं तर कदाचित मला वेगळा लेख लिहावा लागेल.आजोळी घालवलेले सुट्टीचे दिवस, जंगलात जाऊन खाल्लीय कैऱ्या, करवंदे , आज्जीने दिलेले ५ पैसे,१० पैसे, २० पैसे आणि त्यातून मिळालेल्या पेप्सीकोलाचा स्वाद अजूनही असे बरेच काही लिहिता लिहिता अंगात तरळून गेले. असे वाटले लिहिणे इथे थांबवून पुढचा काही वेळ त्यातच राहावे.
काही गोष्टी काळाने आणि पृथ्वीच्या नियमाने पुसून गेल्या, तरी माझी आठवणींची पेटी आणि त्यात कोरलेली सोनेरी अक्षरे माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ते माझं आणि फक्त माझंच आहे. तेवढं राखून ठेवायला देवानीपण परवानगी दिली आहे.
पूर्वीच्या काही गोष्टी जरी बंद झाल्या असतील, तरी काही अजून तशाच आहेत. मी नीट रहावं, आनंदी रहावं, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागावं, कोणाचा राग, लोभ किंवा द्वेष कधीच करू नये. कोणाचे वाईट चिंतू नये.
कधी कोणी माझ्या बरोबर वाईट वेगळेच तर आपल्या मनात त्या व्यक्ती बद्दल आढी ठेवू नये, या आणि अशा बऱ्याच गोष्टी किंवा संस्कार तू मला शिकवलेस आणि त्या मार्गावर जाण्याची सवय लावलीस. काही महत्वाच्या वेळेला धाक दाखवलास ते सुद्धा चांगले संस्कार माझ्या अंगी उतरावे म्हणूनच.एक चांगला माणूस घडावा म्हणून.
आज माझी चाळीशी किंवा तुझी सत्तरी आली तरी सुद्धा नात अजून तेच आहे एखाद्या कमळाच्या पानावर पडणाऱ्या दवबिंदू सारखं ....सुंदर आणि निर्मळ....आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी दिवसातून एकदा तरी तुझी आठवण येतेच...मग काही निमित्त असो वा नसो..पण तेव्हा मनाला हायसं पण वाटते कारण तू सुद्धा कोठेतरी व्यवस्तित आहेस हे माहित असतं.
तू सुद्धा तुझ्या retirement चा आनंद घेत,पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन त्याचा आनंद घेत, नातवंडांच्या बरोबर आनंद घेत तू तुझे अमर्यादित आयुष्य घालवावे हीच इच्छा.
संकटावर मात करून
धीराने उभी राहणारी तू
मला हवी आहेस.
माझं मन घाबरलं तर
धीर देणारी तू
मला हवी आहेस
तुझ्या ताटातला घास
भरवणारी तू
मला हवी आहेस
आयुष्याचे धडे
शिकवणारी तू
मला हवी आहेस
अजुनानी बरीच वर्षे
माझ्या बरोबर तू
मला हवी आहेस
हा लेख प्रत्येकाला लागू पडतो असे मला वाटते, म्हणून मी माझे नाव इथे देत नाहीये. वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुझा/तुझी ..
Comments
Post a Comment