आपल्या मनाचा वापर कसा करायचा:

                                                 आपल्या मनाचा वापर कसा करायचा:

प्रत्येक मन म्हणजे एका गुलाबाच्या फुलासारखं आहे, प्रत्येक फुलात जसा वेगळेपणा असतो तसच माणसाचं पण असतं. मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान बाळ, प्रत्येकाचं वेगळेपण हे त्याच्या वागण्यात, कृतीत,विचार करण्यात,वृत्तीत दिसून येतं. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत त्याचे संस्कार चांगले आहे किंवा वाईट आहेत असं म्हणतो.
आपण असं पण म्हणू शकतो कि जशी मुला मुलीची जडण घडण तसे त्याच्यावर होणारे संस्कार. आता हे संस्कार येतात कुठून ? सुरवात होते ते आई आणि वडीलांपासून, नंतर शाळेतून, नंतर शेजारचे आणि मित्र मैत्रिणीपासून आणि शेवटी समाजाकडून.
याच कारणामुले लहान मुलांना सांगितलं जात "वाईट संगत असलेल्या मुलांपासून लांब रहा किंवा त्यांच्याशी मैत्री करू नकोस, असे मित्र नसलेलं बरे किंवा मैत्रीण नसलेली बरी असंही आई किंवा वडील सांगतात.
आता आपण माणसाचं मन म्हणजे काय यावर विचार करू. काय असतं मन म्हणजे ? तो काही आपल्या शरीराचा भाग नसतो ?पण त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम तर खूप होतात. राग,लोभ,द्वेष,मद,मत्सर या सर्व भावना आपल्याला आहेत, हे सगळं या मनातूनच येतं. जसं आपण माझा हात किंवा माझा पाय म्हणतो तसच आपण माझं मन म्हणतो.
म्हणजेच आपण आणि आपला मन वेगळं आहे. स्वामी विवेकानंदांनीही जसं त्यांचा राजयोगामध्ये लिहिलंआहे कि आपण मनाचा तुरुंगात राहातो आहे, ते जसं पळत तसे आपण पळतो. यानी जर तुमचा पूर्ण ताबा घेतला तर पराकोटीच्या वाईट गोष्टी सुद्धा घडतात . आता तुम्ही म्हणाला सगळेच काय वाईट वागत नाहीत, बरोबर आहे नाहीच वागत, पण थोडं प्रमाण आहे. पण मग मनात घडतं तरी काय ? काय होत असतं ? हि सुरवात कुठून होते ?
हि सुरवात होते २ गोष्टींपासून, एक म्हणजे भीती आणि दुसरा म्हणजे इच्छा. पण या दोन्ही गोष्टींना काहीतरी मार्ग पाहिजे व्यक्त होण्यासाठी, जेव्हा मूल लहान असतं तेव्हा ते सगळ्या गोष्टी रडून किंवा हसून व्यक्त करतं, तेव्हा त्याचाकडे भाषा हे साधन नसतं, जसं जसं ते मोठा व्हायला लागत तशी त्याची भाषा तयार व्हायला सुरवात होते आणि तिथे ते विचार करायला लागत. त्यापूढे त्याच्यावर संस्कार घडायला सुरवात होते.
एक छान वाक्य आहे "आज तुम्ही जे काही आहेत ते तुमचा आता पर्यांतचा विचारांचा परिणाम आहे"
म्हणजे आपल्याला चांगला विचार करण्याची गरज आहे का ? हो नक्कीच . कारण हीच एक अशी गोष्ट आपल्याकडे आहे ज्यामुळे भविष्यात चांगले बदल आपल्या बरोबर आणि त्याच बरोबर समाजामध्ये घडतात.
यात अजून एक गम्मत आहे, तुमची इच्छा आणि कल्पना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर एखादी गोष्ट आपल्या इच्छेत असेल पण त्याचा विरुद्ध आपल्या कल्पनेत असेल तर कोण जिंकणार ? इच्छा की कल्पना?
आपण इथे एक उदाहरण घेऊया : मला जमिनीवर इथून तिथे जायला सांगितलं तर मी लगेच जाईन , पण हेच जर मला १० मजली २ इमारतींना जोडून ठेवलेल्या एका फळीवरून जायला सांगितलं तर ? काय होईल ? तुमची इच्छा कितीही असली तरी तुमची कल्पना तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही, मनात वाईट विचार येतील, मी उंचावरून पडलो तर? मला लागलं तर ? मला काही झालं तर ? माझे हातापायाची हाड मोडली तर? म्हणजे जी गोष्ट घडलीच नाहीये त्याची तुम्ही चिंता करायला लागता? आता तुम्ही म्हणाला हे करायलाच पाहिजे नाही तर माझ्यासाठी चांगला आणि वाईट काय हा फरक कसा करता येणार ? अगदी बरोबर . यात सुद्धा काही असे असतात की जे असं धाडस करतात आणि जिंकून पण दाखवतात, पण त्या मागचं कारण ? त्यांचा स्वतः वरचा विश्वास आणि चांगल्या विचारांची त्यांचा आयुष्याला लागलेली सवय.
माझा मुद्दा आहे या सगळ्यात जिंकत कोण? तर ती कल्पना . म्हणजे आपल्याला या विचारांचा वापर करुन इच्छा असलेली गोष्ट कल्पनेचा रूपाने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करण्याचा बऱ्याच पद्धती आहेत. मी स्वतः काही अवलंबल्या आहेत म्हणूनच हे सांगू शकतो. जस जसे तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल तस तसे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी तुमची स्वतःची एक पद्धत मिळेल जी तुमच्यासाठी असेल आणि तिच्यामुळे तुम्हाला यश मिळेल. तुमचं यश हे पूर्णपणे तुमचा स्वतःवरचा विश्वास,तुमची एखाद्या गोष्टी वरची श्रद्धा,तुमची स्वतःची इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यावर अवलंबून असतो. बघा प्रयत्न करुन.
आता हे कुठे कुठे लागू पडतं? तर उत्तर आहे सगळीकडे. म्हणजे तुमच्या जुळणाऱ्या आणि तुटणाऱ्या नात्यात, तुमचा कामात, तुमचा कडे येणाऱ्या पैशात आणि तुमचा कडून जाणाऱ्या पैशात, तुमचा प्रगतीत आणि तुमच्या अधोगतीत, तुमच्या सुधृढ तब्बेतीवर किंवा तुम्हाला झालेल्या एखाद्या रोगावर सुद्धा.
याबद्दल तुम्हाला इंटरनेट वर खूप काही वाचायला आणि पाहायला मिळेल, पण त्याची नीट पारख करुन त्याची नीट माहिती काढून आणि खात्री करूनच त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. नेहमी सुरवात करताना छोटाश्या ध्येया पासून करा, उदहरण म्हणजे एखादी सवय बदलणे किंवा एकादी नवीन सवय लावणे इत्यादी.
कधीही घाई करू नका हे महत्वाचं. तुमच्या विचारांच्या पद्धती मध्ये बदल व्हायला वेळ लागेल, पण तो चांगला आहे ना या कडे लक्ष द्या. मग बघा तुमची इच्छा कशी पूर्ण होते ते.
लेखक: योगेश दाडकर
वाचल्याबद्धल धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

अभिमन्यू चक्रव्यूह :

!! मला जागा द्या !!