!!!सेवा भाव आणि निःस्वार्थ मन!!!
!!!सेवा भाव आणि निःस्वार्थ मन!!!
गजानन महाराजांची पोथी वाचायला सुरुवात करून ३ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या गेल्या वर्षात खूप चांगली गोष्टी घडल्या!! त्यातली एक शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन आणि तिथल्या सेवेकर्यांनी दिलेला अवर्णनीय अनुभव.
तिथल्या स्वच्छतेबद्दल मी खूप ऐकले होते. जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहीले तेव्हा मनात खूप विचार आले. तेच मी इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
जिथे तिथे फक्त आणि फक्त निरागस , निर्मळ आनंदाने ओसंडून वाहणार मन. मला वाटते त्यामुळेच तिथे येणारा प्रत्येक भक्त स्वतःतले षड्रिपू सोडूनच मंदिरात प्रवेश करतो. तिथली ऊर्जाच इतकी आहे कि ती तुम्हाला हे षड्रिपू सोडायला भाग पाडते. प्रत्येक भाविकाचे मन असीम शांतता अनुभवते. या सगळ्यासाठी गजानन महाराजांची कृपा आहे म्हणूनंच हे सगळे सुरळीत घडते आहे.महाराजांनीच प्रत्येक भाविकांच्या मनात येणाऱ्या भक्तासाठी आत्मीयता,आपुलकी,चांगुलपणा,सद् भाव निर्माण केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून हे भाविक सेवेकरी बनतात. आणि ते जेव्हा अशी सेवा देतात तेव्हा आपल्याला महाराजांचे दर्शन घडत असते. जसे काही महाराजांचं एवढी रूपे घेऊन मला असीम आनंद अनभवू देत आहेत.
सेवेकऱ्यांच्या या सेवेमुळे त्यांनी माझ्या मनातल्या संवेदनेला,आत्मीयतेला,आपुलकीला,चांगुलपणाला खूप जास्त प्रमाणात जिवंत केले आहे. तेव्हापासून मला हे जग असेच असावे असे खूप वाटते. आपल्या आसपास सगळी अशीच माणसे असावीत. आपण स्वतः पण सगळ्यांशी असेच वागावे. म्हणजे या जगातूनच राग,लोभ,स्वार्थ,मद,मोह आणि मत्सर यांचा समूळ नाश होऊन जाईल. काय सुंदर असेल ते जग! जिथे प्रत्येक जण हा प्रत्येकाची फक्त निःस्वार्थ सेवा करेल. प्रत्येक जण आपले काम जणू स्वतःसाठीच करत आहे असे दुसऱ्यासाठी चोखपणे करेल, आणि ते हि मनात आपुलकीचा, चांगुलपणाचा भाव ठेवून.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बदल जर आपल्या आसपास हवे असतील तर त्याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी. आपण कसा विचार करतो?,आपण काही करताना काय भाव मनात ठेवतो?,आपल्या मनात बदल कसे घडतात? खरंच आपले मन कशाच्या मागे पळते आहे का? दुसऱ्याला हरवण्यात आपले मन सुखावते का? मी हे केले मी ते केले यात मन सुखावते का?आपण कोणाचा गैर वापर तर करत नाही ना? आपण दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का तर देत नाही ना?आपल्या सुखासाठी कोणाला त्रास तर देत नाही ना? स्वतःच्या अपेक्षा कोणावर लादत तर नाही ना? स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर दुसऱ्याला कमी तर लेखत नाही ना? आपले कुठलेही नाते हे त्यांच्या बरोबरच्या अनुभवांवर अवलंबून नाही ना?भॊतिक सुखाच्या नादात आपले इतरांबरोबर असलेले नाते आपण आपल्याच हातांनी बिघडवत तर नाही ना? असे हजारो प्रश्न माझ्या मनात येत आहेत. कदाचित ते तुमच्याही मनात येत असतील.
पण मनापासून वाटते कि बदल हा व्हायला हवा ....म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक नागरिक असीम शांततेत आणि आनंदात जीवन जगू शकेल.
म्हणून महाराजांना हि विनंती आहे कि असे जग निर्माण होण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि कृपा सतत सर्व भक्तांवर असुदे!!!!
गणं गणं गणांत बोते!!
योगेश दाडकर
Comments
Post a Comment