!! असीम शांतता आणि अवर्णनीय अनुभव !!

                                 !! असीम शांतता आणि अवर्णनीय अनुभव !!

पुढच्या महिन्यात मला गजाजन महाराजांची पोथी वाचायला सुरवात करून १ वर्ष होईल. पण गेल्या वर्षात माझ्या मनात,विचारात, वागण्यात खूप बदल झाले.जसे मी पहिल्यांदा पोथीचे पारायण केले तेव्हा पासून मला शेगावला जायची आस लागली होती...
गेल्या महिन्यात तो योग्य जुळून आला. मी स्वतःची गाडी घेऊन माझ्या बायकोला आणि मुलीला घेऊन तिथे दर्शनाला गेलो.पुण्याहून टप्याटप्याने प्रवास करत आम्ही शेगावला ४ वाजता पोहोचलो.
वेळेवर पोहोचल्यामुळे आनंद झाला. नवीन ठिकाण , म्हणून आम्ही विसावा भक्त निवास मध्ये चॊकशी करायला गेलो. पण तिथे राहायला खोली शिल्लक नव्हती.
म्हणून आम्ही आनंद सागरच्या रस्त्यानी निघालो, रस्त्यात उजव्या बाजूला आनंद विहार दिसले, तसे आपोआप गाडीची चाके तिकडे वळली आणि आत शिरल्यावर तिथली स्वच्छता राखणारे सेवेकरी. तिथली सुरक्षा बघणारे सेवेकरी, आमची नोंदणी घेणारे सेवेकरी असे सगळे पाहिल्यावर मन एकदम शांत झालं.
त्या क्षणापासून मनातले सगळे विचार काळजी प्रश्न चिंता सगळं गळून पडलं.त्या आवारात वावरताना, तिथला प्रसाद घेताना, तिथल्या सेवेकर्यांची तत्परता बघताना मन आनंदानी ओसंडून वाहत होते.
तिथे येणारा प्रत्येक भक्त , शांत चित्ताने आणि भक्ती भावाने वावरताना दिसत होता. प्रत्येकाच्या मनात एक शांतीचा स्वर तरळत होता.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात एकाच वेळेला एवढी धन ऊर्जा बघायची किंवा अनुभवायची सवयच नव्हती. त्या दिवशी मला जस काही माझ्यातले षड्रिपू गळून पडल्या सारखे वाटत होते. एक स्थिर मनाचा अनुभव मला येत होता. तो असीम आनंद मी भरभरून उपभोगत होतो. अचानक ५ व्या गियर मधल्या माझ्या मनाला महाराजांनी शांत केले. जसे त्यांनी त्या उन्मत्त घोड्याला आणि गायीला केले तसे.
त्या रात्री त्या भक्त निवासामध्ये मी खूप शांत झोपलो होतो, खूप दिवसांनी त्या दिवशी त्यांनी माझ्या मनावरचं ओझे बाजूला सारून मला शांत झोप घेऊ दिली. एक आई आपल्या मुलाला झोपवते तशी झोप किंवा अगदी लहान असताना मिळते तशी.
पण मनात एक हुरहूर म्हणा किंवा उत्कट इच्छा म्हणा किंवा एक प्रेमाची भावना म्हणा त्या दर्शनाच्या वेळेची मी वाट पाहत होती. "कधी एकदाचे ८ वाजत आहेत आणि मी महाराजांचे दर्शन घेतो आहे' असे झाले होते.
आणि तो क्षण आला जेव्हा मी एकटाच त्या गाभाऱ्यात उभा होतो. "मन पुन्हा एकदा निःशब्द झालं, असीम आनंदाची लाट, सच्चीदानंदाची लाट अनुभवू लागलं, त्या क्षणाला आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टीमागे उगाच पळतो हे स्पष्ट झालं".
तिथल्या सेवेकर्यांनी कृतीतून दाखवलेली स्वच्छतेची शिकवण, सतत अविरत निःस्वार्थ सेवा करण्याचा धर्म, गणं गणं गणात बोते शब्दांचे अखंड जप, माउली म्हणून कानावरती पडलेली प्रेमाची, मदतीची हाक आणि तो तिथला प्रत्येक क्षण मनात साठवून जड अंतःकरणाने मी परतीच्या प्रवासाला इच्छा नसताना निघालो. सतत वाटत होते "इथेच राहावं, महाराजांच्या सानिध्यात, मनाला त्या आनंदातच राहू द्यावे".
पण भक्त निवास हे ऐश आराम करण्याचे ठिकाण नसून , माझ्यासारख्या महाराजांच्या लाखो भक्तांना राहण्यासाठी विसावा आहे, जो आनंद मी उपभोगला तो सर्व भक्तांनी अनुभवावा हीच इच्छा.
आज मी माझ्या घरी जरी परत आलो आहे तरी, माझं मन त्या ठिकाणी कधी पोहोचत हे मलाच कळत नाही.माझ्या मनाची हि ओढ कधीच कमी होणार नाही.
तिथून परत आल्यापासून माझ्या मनाचा वेग वाढलाच नाहीये.माझ तेच आयुष्य मी परत जगतोय पण मन शांतच आहे. महाराजांच्या आशीर्वादाने माझं मन शांत झाले तसे सर्व भक्तांचे व्हावे हीच इच्छा.
गणं गणं गणांत बोते !!!

Comments

Popular posts from this blog

अभिमन्यू चक्रव्यूह :

!! मला जागा द्या !!

आपल्या मनाचा वापर कसा करायचा: